फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी जिथे देशभर रंगाचा उत्सव साजरा होतो, तिथे नाशिककर फाल्गुन कृष्णपंचमीला, अर्थात रंगपंचमीलाच रंगपंचमी साजरी करतात...
नाशिकची रंगपंचमी खासच...पेशवाईत रहाड उत्सवाची सुरू झालेली परंपरा आजही टिकून आहे...परंतू ती देखिल शेवटची घटका मोजत आहे...मधली होळी, त्रिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, शनिचौक या ठिकाणी पेशवाईतल्या रहाडी आहेत...परंतू यातील बहुतांशी ठिकाणचे रहडाचा परंपरागत कारभार सांभाळणार्या संस्था डबघईला आल्यामुळे रहाडीच्या उत्सवात सातत्य नसते...परंतू रहाडींचे कारभारीच थंडावल्याने या उत्सवाला उतरती कळा लागली आहे...
नेहरू चौकात असलेल्या आमच्या परदेशी वाड्यातली देवी दिल्ली दरवाजावरच्या रहाड उत्सवाचे केंद्स्थान...पूर्वी आमची पणजी भागुबाई गोदावरी नदीच्या पश्चिमेकडील बाजुच्या रंगोत्सवाचे नेतृत्व करायच्या...आमच्या वाड्यात तुरेवाल्यांची देवी, तर नदीच्या पूर्वबाजुला सांडव्यावरची देवी ही हलगीवाल्यांची देवी...
| - मैत्रेयी, तुरेवालाचा मानाच्या डफासह |
| - नम्रता, पळसाच्या फुलांचा रंग हर्षोल्हासात उधळदाना... |
| -उत्तम गंध व रंग असा पळसाचा बहुगुणी रंग अंगावर घेण्यासाठी सोमवारपेठेतल्या नेहरू चौकात बाळगोपाळांनी अशी रांग लावली होती... |
आमचे आजोबा हयात असताना तुरेवाल्यांची रहाड खुप गाजायची...आजोबा पहिली उडी रहाडीत मारायची व त्यानंतर त्यात इतर सर्वांना उडी मारता यायची...आजोबांच्या उतारवयात हा मान बेळे कुटुंबाकडे गेला...परंतू तुरेवाले मंडळाचे कामकाज कमालीचे थंडावल्याने या रहाडीला उतरती कळा आली आहे...तुरेवाले पंच मंडळाचे मुख्य आधारस्तंभ असलेले पेंटरकाका उर्फ शहाणे काका हे सुद्धा बरेच थकले आहेत...
रसायनी...
| - नाशिकच्या फुलबाजारात विक्रीसाठी आलेली पळसाची फुले |
| - जगदाजी, मेळघाटात देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या आदिवासी बांधवांना नैसर्गिक रंगाचे धडे गिरविताना |
डोळ्यावर पट्टी बांधलेले अन्न व औषध प्रशासन...!
अक्षरश: टनावारी घातक रासायनिक रंगाची लोक होळी खेळले...काहींनी कोरडे रंग खेळणे पसंत केले...परंतू हल्ली जिथे तमाम खाद्यपदार्थ, व शेती माल हा मिलावटी व दुय्यम दर्जाचा तिथे तुम्हाला खाद्यपदार्थांचा वापर असलेले अस्सल रंग कोण देणार?
| - बोरगडाच्या पायथ्याला असलेल्या वनखात्याच्या संरक्षीत औषधीवनात पावसाच्या ढगांच्या पार्श्वभूमीवर बहरलेला मनमोहक पळस |
भांडवलदार मंडळी अधिक नफा कमावण्यासाठी एक एक चांगल्या गोष्टी बाजुला ठेवताना दिसतात...पूर्वी सौम्य रसायने आरारोट, मक्याचे पिठ, मुलत्तानी मातीत मिसळून सुके रंग तयार केले जायचे...हल्ली काय काय घाण मिसळतात...परंतू आजचा दिवस डोळ्यावर पट्टी बांधुन घरी बसण्याचा...
| - दिल्ली दरवाजेच्या रहाड उत्सवात हिरहिरीने सहभाग घेणारे स्व. राजेंद्र खैरे. |
या पैकी एकही खात्याचा एकही अधिकारी आज पुढे सरसावून आला नाही, त्यामुळे जहाल रासायनिक रंग तयार करून कोट्यावधींची माया जमवणारे भांडवलदार उद्योजक, वितरक व्यापारी, असे कुणाचा केसही वाकडा झाला नाही...लोकांना मात्र परंपरेच्या नावाखाली पैसे मोजुन खोटी नाटी होळी साजरी करावी लागली...
तत्वज्ञान सांगणार्यांचा आजचा महत्वाचा दिवस...परंतू 'नैसर्गिक रंगांचा वापर करा', असा सदेश देणार्या स्वयंसेवी संस्थांनी नैसर्गिक रंगांचे कोणतेही पर्याय दिले नव्हते...काहींनी नैसर्गिकच्या नावाखाली रासायनिक, मिलावटी रंग विकुन आपले उखळ पांढरे केले...दरवर्षाप्रमाणे यंदाही काही संस्थांनी, आम्ही सेंद्रीय रंग तयार केले व विकले, असे छातीठोकपणे सांगितले, परंतू त्यांचे नैसर्गिक, सेंद्रीय रंग आजवर कधी बघायला मिळाले नाहीतीन लाखास एक पोते...?
आज नाशिकच्या मुख्य फुलबाजारात पळसाच्या फुलांच्या फक्त पाचच पोत्यांची आवक झाली...पळसाची कोरडी फुले तास दोन तास पाण्यात भिजवली तरी उत्तम केशरी रंग तयार होतो...मुख्यम्हणजे या फुलांचा गंध तुम्हाला जंगलात आल्याची जाणिव करून देतो...
आजचाच दिवस पळस फुले विकली जातात, म्हणून आमच्या आदिवासी बांधवांचा पैसे कमावण्याचा दिवस, त्यामुळे एक वाटा चक्क पन्नास रूपयांना होता...तरीही चार मोठ्या वाट्यात पिंपभर रंग तयार होतो...सालाबाद प्रमाणे आम्ही यंदाही पळसाचा रंग तयार केला...त्यामुळे गल्लीतले बाळगोपाळ हा रंग आपल्या अंगावर घेण्यासाठी रांगेने येऊन अस्सल रंगोत्सवाचा आनंद घेत होते...बघणार्यांना मात्र, ही मंडळी अशी रंगेत येऊन लोट्या लोट्याने रंग अंगावर का घेत आहेत? हे बघुन अचंभा होत होता...
एक विचार: पंधरा लाखाची लोकसंख्या असलेल्या नाशिकमद्ये पणसाची पाचच पोती विकली गेली, म्हणजे तीन लाख लोकसंख्येमागे पळसाच्या फुलांचे एकच पोते?
नैसर्गिक होळीचे केवढे विषम व अस्वस्थ करणारे हे प्रमाण!
जगदा मॅडम...
आजच्या दिवशी मला जगदा मॅडमची आठवण आल्याशिवाय राहिली नाही...कोण आहेत या जगदाबाई...
जगदा राजप्पा...धारानगरीच्या, अहो हैदराबादेच्या...गेल्या अनेक वर्षांपासून त्या कपडा व तत्सम वस्तु नैसर्गिक रगांपासून रंगविण्याचे प्रशिक्षण देत आहेत...माझी त्यांची भेट मेळघाटात झाली...त्यांनी चार दिवसात २२ विविध रंग व छटांचे नैसर्गिक रंग तयार केले...या रंगांपासून त्यांनी बांपूच्या पट्ट्या व काड्या रंगवून दाखविल्या...गेल्या तीन चार वर्षांपासून त्या बांबुकरिता रंग तयार करण्याचा प्रयोग करत आहेत...पंचाहत्तरी पार केलेल्या या मातृतूल्या जगदाबाईंची शिकविण्याची पद्धत एकदम प्रभावी अशी आहे...आदिवासींनाही त्या पाण्याचा ph तपासायला व त्यामुळे रंग तयार करण्यावर कसा परिणाम होतो हे शिकवतात...
जगदाजींची एक कार्यशाळा नाशिकमध्ये यंदा घेण्याचा मी खुप प्रयत्न केला, परंतू विविध कारणांमुळे तो सफल ठरू शकला नाही...होळीकरिता त्या कोरडे रंग तयार करू शकतात, परंतू ओले रंग तयार करण्याची प्रक्रीया प्रायोगिक असेल, त्याकरिता लागणारे भांडवल उभे करण्याची तयारी एका राजकीय कार्यकर्त्याने दाखविली, परंतू त्याला स्थानिक आमदारांचे मन वळविता आले नाही, अन्यथा आम्ही पन्नास हजार लोकांना पुरेल इतका ओला नैसर्गिक बनविण्याचा विचार पक्का केला होता...लोकांना नैसर्गिक पदार्थापासून हे रंग शिकविणे व त्यांना वापरण्याकरिता अतिशय मापक दरामध्ये रंग देण्याची योजना होती...पाठबळ व पैशा अभावी ती सफल ठरली नाही...परंतू मोठ्या संस्था, सरकारचे अधिकारी पुढे आल्या शिवाय लोकांना बनावट, दुय्यम, घातक पद्धतीनेच सणवार साजरे करावे लागतील का? किती दिवस हे असे चालायचे? प्रश्न मोठे विचलीत करणारे!
गल्लो गल्लीत मुले मात्र निरागसपणे घातक रसायनांचे रंग बिनदिक्कत खेळताना दिसत होते...त्यात आमची अडीच वर्षाची जान्हवी होती...मी पळसाची फुले घेऊन येण्यापूर्वीच कोणीतरी तिच्या हातात रंगाची पुढी दिली होती...त्या पुढीतला रासायनिक रंग ती सारखी स्वत:च्याच चेहर्याला लावत होती!
नाशिकच्या वातावरणात हर्षोल्हास...
| - नाशिकच्या येवले तालुक्यात असलेल्या मदापपूर संरक्षित संवर्धन क्षेत्रात बहरलेला मनमोहक पळस |
लोक उत्सवाशिवाय सुद्धा वर्षभर असेच आनंदात, बंधुभावाने राहो! असा विचार मनात येऊन गेला...तो सफल ठरला तर किती बरे होईल!
